जेजुरी गड संवर्धनासाठी
१०९ कोटी निधी मंजूर

पुणे: – महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीच्या विकासासाठी १०९ कोटींच्या विकास आराखड्यास अखेर मान्यता मिळाल्यानंतर आता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा व शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे.
मंदिराचा गडावरील परिसर एक हजार २४० चौरस मीटर असून पहिल्या टप्प्यातील कामात मंदिराचे संवर्धन आहे त्या स्थितीत केले जाणार आहे. त्यासाठी १७ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. गडाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता हे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले जाणार आहे.
गडावर पूर्वी सुमारे १५० दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या. त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धनही या पहिल्या टप्प्यात होणार आहे. मंदिराचे काम मुख्यत्वे दगडांत केलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेले दगड बदलण्यात येणार आहेत. तसेच सुस्थितीत असलेल्या दगडांना चमकदार करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी १५० दीपमाळा असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व दीपमाळा सध्या पुनर्स्थापित करता येणे शक्य नसले, तरी त्यातील अनेक दीपमाळा पुन्हा उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या दीपमाळांचे संवर्धन दगडांना बदलून चमकदार केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचा विकास, रस्ते, पाणी, निवासी व्यवस्था याचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर म्हणाले.

Scroll to Top