जेजुरी – जेजुरी गडावरील खंडोबाला अखंड हिंदुस्तान कुलदैवत मानतो. या खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात आज हापुस आंब्यांची आणि पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले. यावेळी खंडोबाचा गाभारा आमराईप्रमाणे मनोहारी दिसत होता. अशी आंब्याची आरास ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी केली जाते. ही सजावट खंडोबाच्या भाविकांनी अर्पण केलेल्या आंब्यांपासून केली जाते. सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. अशातच रविवार असल्याने अनेक भाविक जेजुरीत दर्शनासाठी गर्दी करतात. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळीच ही आरास करण्यात आली. आंब्याचे डहाळे आणि त्यात आंबे लावल्याने मंदिराचा गाभारा हिरवागार झाला. या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जेजुरीच्या खंडोबाला आंब्यांची आरास
