मुंबई- देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र पावसाळा हंगामाच्या पहिल्याच जून महिन्यात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला आहे.देशात जून महिन्यात सरासरी १६५.३ मिमी पाऊस पडतो. परंतु यंदा १४७.२ मिमी पावसाची नोंद झाली.जून महिन्यात २००१ नंतर हा सर्वात कमी पाऊस झाला आहे.चालू जुलै महिन्यात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जून महिन्यात कमी पाऊस पडल्याने आता सर्वाचे डोळे जुलै महिन्याकडे लागले आहेत.यंदा मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी ३० मे रोजी दाखल झाला.त्यानंतर महाराष्ट्राकडे त्याची दमदार वाटचाल सुरु झाली.परंतु कोकणात आल्यानंतर मान्सूनने दीर्घ ब्रेक घेतला. ११ ते २७ जून दरम्यान देशांत सर्वात कमी पाऊस झाला.जूनमध्ये रुसलेला मान्सून जुलै महिन्यात दमदार बरसणार आहे. हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.देशात जुलै महिन्यात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.