बीजिंग : चीनचे सर्वोच्च तज्ज्ञ झोंग नानशान यांनी दावा केला आहे की जूनच्या अखेरीस कोरोना महामारीची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे दर आठवड्याला ६५ दशलक्ष रुग्णांची नोंद होऊ शकते. कोरोना संसर्ग विषाणूचे एक्सबीबी प्रकार टाळण्यासाठी लवकरच २ नवीन लसी बाजारात आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझू येथील २०२३ ग्रेटर बे एरिया सायन्स फोरममध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
एप्रिलच्या उत्तरार्धात आणि मेच्या सुरुवातीस कोरोनाची एक लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांना आधीच व्यक्त केला होता. त्यानुसार, मे अखेरीस, चीनमध्ये या प्रकारामुळे, दर आठवड्याला सुमारे ४० दशलक्ष प्रकरणे समोर येतील. त्यानंतर जूनमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. झोंग म्हणाले- कोरोनाची ही नवीन लाट अधिक धोकादायक असेल आणि गेल्या वर्षाच्या शेवटी आलेल्या लाटेपेक्षा संक्रमणाचा प्रसार अधिक वेगाने होईल. मात्र एक्सबीबी चा मुकाबला करण्यासाठी दोन कोविड-१९ लसींना मान्यता दिली असल्याची माहिती झोंग यांनी दिली असून, नवीन लसी लवकरच बाजारात आणल्या जातील असे स्पष्ट केले. लवकरच आणखी तीन ते चार लसींना मान्यता दिली जाईल, असेही ते म्हणाले. अधिक प्रभावी लस विकसित करण्यात आम्ही इतर देशांपेक्षा पुढे असल्याचा दावाही तज्ञांनी केला आहे.
दुसरीकडे कोरोनाची ही एक दुसरी लाट असल्यामुळे याबाबत चिंता करण्यासारखे काही नसल्याचे पेकिंग युनिव्हर्सिटी फर्स्ट हॉस्पिटलमधील श्वसन तज्ज्ञ वांग गुआंगफा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दुसरी लाट नेहमी कमी प्रभावी असते. या लाटेमुळे लोक संक्रमित झाले तरी रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढणार नाही आणि त्याची लक्षणे किरकोळ असतील. मात्र जे लोक आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त आहेत, किंवा ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे.