नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील उत्तर भागात जुन्नर-ओतूर एसटी बससेवा कोरोनाकाळापासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. ही एसटीसेवा तत्काळ पूर्ववत सुरू करावी अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे.
जुन्नर ते ओतूर ही एसटी बस नारायणगाव एसटी आगाराकडून कोरोना काळात बंद करण्यात आली होती. ही एसटी बस अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही.त्यामुळे या बसच्या प्रवाशांना,नोकरदार व विद्यार्थ्यांना जुन्नर – नारायणगाव-आळेफाटामार्गे ओतूर येथे ४५ ते ५० किमी अंतर कापून घरी यावे लागत आहे.मात्र जुन्नर ते ओतूर हेच अंतर १४ ते १६ किमी आहे.एसटी फेर्या बंद असल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहने,नियमबाह्य, बेकायदेशीर वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सायंकाळची ६ वाजताची फेरी तरी पूर्ववत सुरू करावी,अशी मागणी माळशेज परिसरातील नागरिकांनी केली आहे.