जुनी पेन्शन योजना
लागू करण्यासाठी संप

शेवगाव – राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. याबाबत तालुक्यातील सर्वच कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन दिले. पंचायत समिती लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना नाकारली व अंशदायी पेन्शन योजना सुरू करुन सर्व कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतरचे जीवन अंधकारमय करून टाकले आहे. यामुळे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. इतर राज्यातील सरकारप्रमाणे विनाअट राज्यातील सर्व कर्मचार्‍यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Scroll to Top