नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली जगातील बड्या देशांमधील बड्या नेत्यांचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. आजपासून नवी दिल्लीत जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू होत आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी२० शिखर परिषदेपूर्वी अनेक कार्यक्रम येथे होणार आहेत. यासाठी नवी दिल्लीतील सर्व रस्ते आणि प्रमुख इमारती फुलांनी सजवण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या कुंड्यांमध्ये रंगीबेरंगी फुले लावण्यात आली आहेत. जिकडे पाहावे तिकडे रंगीबेरंगी फुलांची बाग दिसत आहे.
आजपासून नवी दिल्लीत बड्या दिग्गजांचा मेळावा होत आहे. जी-२० साठी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, जर्मनी, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत. याशिवाय श्रीलंका आणि बांगलादेशसह इतर देशांचे परराष्ट्र मंत्री, युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार प्रतिनिधीही या बैठकीत पाहुणे म्हणून येत आहेत. जगातील या बड्या देशांसमोर आपल्या देशाची प्रतिमा उंचवण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली आहे.