नवी दिल्ली- जी-२० परिषदेची आज रविवारी सांगता झाली. भारताकडे नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी २० चे अध्यक्षपद राहणार आहे. त्यानंतर हे अध्यक्षपद ब्राझील भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रावेळी केली.
जी-२० परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. विविध राष्ट्रप्रमुख आज सकाळीच राजघाटावर पोहोचले. राजघाटावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानिस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रॅूडो, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना खादीची शाल देऊन सन्मानित केले. गांधीजींना आदरांजली वाहिल्यानंतर राजघाटावर रघुपती राघव राजा राम हे गीत वाजविण्यात आले. त्यामुळे राजघाटावरील सगळेच पाहुणे भारावून गेले होते.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विविध देशांच्या प्रमुखांना महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा भेट दिली.
आजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रानंतर मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ लुला दा सिल्वा यांच्याकडे अध्यपदाचे प्रतिक असणारा वॉवेल सुपूर्द करत त्यांचे अभिनंदन केले. ब्राझील पुढील वर्षी जी-२० परिषदेचे आयोजन करणार आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी जी-२० शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा केली.
तत्पूर्वी तिसऱ्या सत्रादरम्यान जाहीरनाम्याला औपचारिक मान्यता देण्यात आली. शिखर परिषदेच्या आजच्या अखेरच्या तिसऱ्या सत्रानंतर मोदी म्हणाले की, जग बदलत आहे आणि त्यासोबत जगातील संस्थांनाही बदलण्याची गरज आहे. आतापर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थापनेच्या वेळी जेवढे सदस्य होते, तेवढेच सदस्य आहेत. कायमस्वरूपी देशांची संख्या वाढली पाहिजे. यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, गरीब देशांच्या कर्जाच्या समस्येकडे लक्ष द्यावे लागेल. भूक संपवण्यासाठी जगाला प्रयत्न वाढवावे लागतील. शिखर परिषदेपूर्वी ब्राझील आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना रोपटे भेट दिले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यानंतर व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना झाले.
जी-२० ची यशस्वी सांगता! पुढील वर्षीचा यजमान ब्राझील
