नवी दिल्ली – जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवर लावला जाणारा १८ टक्के जीएसटी रद्द करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.गडकरी यांनी सीतारामन यांना पत्र लिहिले असून पत्राद्वारे ही आग्रही मागणी केली आहे. जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवर जीएसटी लावणे म्हणजे जीवनातील अनिश्चितेवरच कर लावण्यासारखे आहे. आपल्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांची परवड होऊ नये या उद्देशाने जीवन विम्याचे संरक्षण घेतले जाते. त्यामुळे जीवन विम्याच्या हफ्त्यांवर कर लावला जाता कामा नये. दुसरीकडे आरोग्य विमादेखील सामाजिकदृष्टया आवश्यक आहे. त्याच्या हफ्त्यांवर कर लावण्यामुळे या क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागतो, असे गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.नागपूर विभागीय जीवन विमा महामंडळ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरींची यांची भेट घेऊन विमा क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या होत्या. तसेच या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याचा आग्रह गडकरी यांच्याकडे केला होता.त्याचा संदर्भ देत गडकरी यांनी सीतारामन यांच्याकडे ही मागणी केली आहे.दरम्यान, गडकरी यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत रास्त असून विमा हफ्त्यांवरील १८ टक्के जीएसटी रद्द केल्यास देशातील विमा क्षेत्राची भरभराट होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.