गुरुग्राम – तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे त्रासदायक आणि कधीकधी जीवघेणेही ठरू शकते याची प्रचिती देणारी एक दुदैवी घटना काल सकाळी दिल्लीलगतच्या गुरुग्राम येथे घडली. कारमधील जीपीएस प्रणालीने चुकीचा मार्ग दाखवल्याने एका अपूर्णावस्थेत असलेल्या पूलावरून कार खाली कोसळली आणि कारमधील तिघांचा मृत्यू झाला.
गुरुग्राममधील एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करणारे हे तीन कर्मचारी होते.
रविवारी सकाळी ते गुरुग्राम येथून फरिदपूरला एका लग्न समारंभासाठी चालले होते.त्यांच्या कारमधील जीपीएस प्रणाली दाखवत असलेल्या मार्गानुसार ते चालले होते. वाटेतील सामरेर ते फरीदपूरला जोडणारा रामगंगा नदीवरील पूल अपूर्णावस्थेत होता. याची कल्पना त्या तिघांना नव्हती. जीपीएस प्रणालीने नेमका तोच मार्ग सुचविला. पुढे काय वाढून ठेवले आहे याची मुळीच कल्पना नसल्याने ते तिघे पुलाचे बांधकाम जिथपर्यंत पूर्ण झाले होते तिथपर्यंत पोहोचताच त्यांची गाडी थेट नदीत कोसळली आणि तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
या दुर्घटनेला जशी जीपीएस यंत्रणा कारणीभूत ठरली तितकीच सरकारी अनास्थाही कारणीभूत ठरली. कारण पुल अपूर्णावस्थेत आहे, त्याचा वापर करू नये अशा कसल्याही सुचना देणारे फलक संबंधित प्रशासनाने त्या पुलावर लावले नव्हते. जिथे पूल संपतो तिथे अडथळेही उभारले नव्हते.