जीएसबी मंडळाचा यंदा ४०० कोटींचा विमा

मुंबई – सर्वात श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा लौकीक असलेल्या गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सेवा मंडळाने यंदा गणपती बाप्पाचा विक्रमी ४०० कोटींचा विमा उतरवला आहे.मुंबईतील किंग्ज सर्कलमध्ये असलेल्या जीएसबी सेवा मंडळाने विम्याच्या रकमेबाबत आपलाच गेल्या वर्षीचा विक्रम यंदा मोडित काढला आहे. गेल्या वर्षी मंडळाने ३६० कोटींचा विमा उतरवला होता.त्यात यावर्षी आणखी चाळीस कोटी रुपयांची भर घालण्यात आली आहे. या मंडळाचा गणपती महागणपती म्हणून ओळखला जातो.महागणपती मूर्ती मौल्यवान रत्नजडित सोन्या-चांदिच्या दागिन्यांनी सजविली जाते. मूर्तीवर तब्बल ६६ किलो सोन्याचे तर ३२५ किलोचे दागिने असतात. बहुतांश दागिने हे भाविकांनी महागणपतीला अर्पण केलेले आहेत.मंडळाने घेतलेल्या विमा संरक्षणामध्ये मूर्तीवरील दागिन्यांची चोरी, मंडपाला आग लागणे किंवा भूकंप यांसारख्या आपत्तींसह पुजारी आणि गणेश मंडपात विविध कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून ही विमा योजना घेण्यात आली आहे. याच कंपनीने लालबागचा राजा मंडळाचाही विमा उतरवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top