जालना – मोसंबी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जालना जिल्ह्यात मोसंबीचे दर ६ ते ७ रुपये किलो इतके घसरले आहेत. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मोसंबी दरात एवढी मोठी घट झाल्यामुळे एका शेतकऱ्याने तर सुमारे ८ ते १० टन मोसंबी जालना बाजार परिसरातच फेकून दिली. शेतकऱ्यांनी मोसंबीला २५ ते ३० रुपये किलो इतका दर मिळावा अशी मागणी केली आहे.
मोसंबीचे दर घसरण्यामागे उत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा प्रभाव हे कारण असल्याची चर्चा आहे. थंडीमुळे दिल्ली व जयपूर येथील मोसंबी बाजार बंद आहे. त्यामुळे जालन्याच्या मोसंबीची मागणी घटली आहे. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, मागील २ते ३ वर्षांपासून संत्रा मोसंबीच्या दरात घट झाली आहे.याकडे राज्य शासनाने लक्ष दिले पाहिजे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत भाजपा नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याची आतुरता आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यास शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल.