मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा प्रमुख आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने जामिनासाठी केलेल्या अर्जात चक्क मुकेश अंबानींचे कौतुक करत त्यांच्याबद्दल आपल्याला अतीव आदर असल्याचे म्हटले आहे. सचिन वाझेने आपल्या अर्जात म्हटले आहे की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे योगदान दिले आहे. त्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला अंबानी आणि त्यांचे कुटुंबियांना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे, हे पक्के ठाऊक आहे. त्यामुळे अशा त्यांना स्फोटकांची भीती दाखवणे आणि धमकी देणे यासारख्या मूर्खपणाची मी कधी कल्पनाही करणार नाही. या याचिकेत त्याने असेही म्हटले आहे की, ‘घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत नीता भाभी, मुकेश भैय्या अँड फॅमिली यांचा उल्लेख होता. ही नावे नीता अंबानी, मुकेश अंबानी यांची आहेत असे मानले तरी ही चिठ्ठी कुणी लिहिली ती व्यक्ती सापडलेली नाही. दोन वर्षे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी यांचे आपल्याला धमकावण्यात आले, असे कोणतेही जबाब नोंदवलेले नाहीत. ‘फिर्याद ही आरोपांवर आधारित आहे. आरोपीला 15 दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत ठेवता येत नाही. मला अटक करण्यात आली, तेव्हा ती यूएपीए कायद्याअंतर्गत करण्यात आली नव्हती, त्यामुळे माझी कोठडी बेकायदेशीर आहे. 10 हजार पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र आहे, 10 आरोपी आहेत आणि 320 साक्षीदारांचा हवाला देण्यात आला आहे, मार्च 2021 मध्ये अटकेला दीड वर्ष उलटूनही खटला सुरू होण्यासाठी ज्या प्रक्रियेचे पालन करावे लागते, ती प्रक्रियाच सुरू झाली नाही. पोलीस खात्यातील अंतर्गत वैमनस्यामुळे कदाचित मला या खोट्या प्रमाणात गोवण्यात आले असावे. असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जामिनासाठी वाझेकडूनमुकेश अंबानींचे कौतुक
