ठाणे- कल्याण ग्रामीणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू ) पाटील आणि ठाणे शहरचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आज उमेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. आधी ते ठाण्यात अविनाश जाधव यांच्या सोबत अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिले . त्यानंतर ते राजू पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. राज ठाकरे हे या आधी कधीच उमेदवारासोबत अर्ज भरण्यासाठी गेले नव्हते. ते आज पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले.
शक्तीप्रदर्शनावेळी जाधव म्हणाले की, राज ठाकरे पहिल्यांदा कोणाच्यातरी अर्ज भरायला येत आहे. ठाण्यात राजसाहेब आल्याने आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पाच वर्षांमध्ये निवडणुकीत संदर्भात प्रचाराच्या ज्या नवीन पध्दती आल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा वापर करणार आहोत. यावेळची निवडणूक आम्ही जोरात आणि जोशात लढणार आहोत.
राजू पाटील म्हणाले की, आजच्या दिवशीच म्हणजे पाच वर्षापूर्वी मला जनतेने कौल दिला होता, काम करण्याची संधी दिली होती आणि माझी स्वतःची इच्छा आहे की जी कामे राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढणे गरजेच आहे.