जात्याला व्यायाम उपकरणाचा दर्जा! दत्तात्रेय गाडगीळ यांना मिळाले पेटंट

पुणे :

जात्याचा उपयोग आपल्याला केवळ दळणकांडणापर्यंतच ठाऊक आहे. मात्र हडपसरमध्ये राहणाऱ्या दत्तात्रेय गाडगीळ (वय ६१) यांनी जात्याचा वापर करून व्यायामाचे ‘वेतोबा उपकरण’ तयार केले आहे. सात वर्षे प्रयत्न केल्यावर केंद्र सरकारनेही त्याची दखल घेतली असून व्यायामाचे उपकरण म्हणून या उपकरणाला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. मूळचे अभियंता असलेले गाडगीळ यांनी जात्यावर व्यायाम करायचा तर त्यासाठी कोणालाही वापरता येईल असे उपकरण तयार करण्याचा ध्यास घेतला.

पाच-सहा हजार रुपयांत तयार होणाऱ्या या उपकरणाचे त्यांनी ‘वेतोबा उपकरण’ असे नाव ठेवले आहे. गाडगीळ म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी महिला जात्याचा वापर करत असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम होते. जाते वापरताना, त्यासाठी खोलगट जागा लागते, त्याचा आवाज येतो, या अडचणी नव्या उपकरणात दूर केल्या. यासाठी जात्याचा आवाज दूर करण्यासाठी वाळूचा वापर प्रभावी होत असल्याचे दिसून आले. जाते फिरवताना ते हलू नये, यासाठी त्यालगत बसण्यासाठी व्यवस्था केली. त्यामुळे ते जाते १००-१२५ किलो वजन सहज पेलू शकते. अनेक चाचण्या घेतल्यावर ‘वेतोबा उपकरण’ पूर्णत्वास आले. ‘वेतोबा उपकरण’ वापरताना जोर कमी, जास्त करण्यासाठी या उपकरणामध्ये भरलेली वाळू कमी जास्त करून ते साध्य होऊ शकते. या उपकरणात व्यायामाचे परिभ्रमण मोजण्यासाठी करण्यासाठी डिजिटल मीटर आहे एका मिनिटामध्ये साधारण २५-३० रोटेशन होतील इतपत जोर दिल्यास योग्य व्यायाम होत असल्याचेही गाडगीळ म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top