जहाल नक्षलवादी संजय रावला पत्नीसह हैदराबाद येथून अटक

हैदराबाद – नक्षली चळवळीत गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य, पश्चिम घाटचा कमांडर संजय राव उर्फ दीपक आणि त्याची पत्नी मुरुवपल्ली रजी उर्फ सरस्वती हिला हैदराबादमधून अटक करण्यात तेलंगण पोलिसांना यश आले. संजय आणि त्याची पत्नी उच्चशिक्षित असून संजय राव याच्यावर २ कोटींपेक्षा अधिक बक्षीस होते.
संजय राव हैदराबाद येथून अबुझमाडमध्ये एका महत्वाच्या बैठकीसाठी जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळीच तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमधून त्याला पत्नीसह अटक केली. दोघांच्या अटकेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. संजयला २०१५ मध्ये पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून अटकदेखील करण्यात आली होती. मात्र, जामिनावर सुटका होताच तो पुन्हा सक्रिय झाला होता.
वडील डाव्या कामगार चळवळीचे नेते असल्याने त्याला घरातूनच डाव्या विचारांचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे शिक्षणानंतर तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या विविध पदांवर कार्यरत होता. १९९९ साली नक्षलवाद्यांचा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य कोनाथ मुरलीधरन उर्फ अजितने नक्षलबारी गटाची स्थापना केली. यामुळे प्रभावित होऊन संजयनेदेखील मुरलीधरनची साथ देण्याचे ठरवले. त्याला या गटाचा महाराष्ट्र प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून तो महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांत विविध पदांवर कार्यरत होता. याकाळात त्याने अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या. तो मुंबई, पुणे आणि हैद्राबाद येथे नेहमी ये-जा करायचा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top