पालघर – जिल्ह्यातील जव्हार शहराजवळ असलेल्या खडूळ तलावाचे शासनाच्या अमृत सरोवर योजनेंतर्गत गेल्या मे महिन्यात सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र हाच अमृत सरोवर खडूळ तलाव शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसात एका बाजूने फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले.
अमृत सरोवर योजनेंतर्गत या तलावाचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. तलावाची खुदाई करून तलावाभोवती दगड पिचिंग करून अमृत सरोवर प्रकल्प तयार करण्यात आला. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले आहे. एका बाजूने हा तलाव फुटला. त्यामुळे अमृत सरोवर योजनेंतर्गत होणारे पुढील कामही आता रखडणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जव्हार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ईश्वर पवार यांनी याबाबत सांगितले की, खडूळ तलावाच्या कामासंदर्भात संबंधित यंत्रणेने कोणत्याही प्रकारचा अहवाल पंचायत समिती कार्यालयात दिलेला नाही किंवा तसे कळवलेले नाही.