नाशिक- चांदवडचे वीर जवान विकी अरुण चव्हाण यांच्यावर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चांदवडच्या हरनुल पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. विकी यांचे पार्थिव गावात येताच गावातील नागरिकांनी विकी यांच्या नावाचा जयजयकार केला. गावातून पार्थिव थेट विकी यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी विकी यांच्या आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले. कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणवले. तिथे उपस्थित नागरिकांनी जवान विकी यांना पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. उमेश काळे, प्रांत चंद्रशेखर देशमुख, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, जिल्हा सैनिक अधिकारी ओमकर कापले, देवळाली कॅम्पचे मेजर अविनाश कुमार यांसह इत्यादी नागरिक उपस्थित होते. सैन्य दलात जम्मू काश्मीर राज्यातील पूंछ (राजौरी) येथे नियुक्तीला असलेल्या जवान विकी हे ग्रीक रोमन कुस्तीचा करत होते. त्यावेळी गंभीर जखमी होऊन त्यांचे निधन झाले. शनिवारी पूंछ येथून त्यांचे पार्थिव दिल्लीला आणण्यात आले. त्यानंतर रविवारी पार्थिव मुंबईला आणण्यात आले.
जवान विकी चव्हाण यांना चांदवडमध्ये अखेरचा निरोप
