मुंबई – जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असे वाटत नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या कोकणातील गुहागर मधून निश्चित झालेल्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की असल्याचेही कदम यांनी स्पष्टच सांगितले. तसेच, विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदारसंघात पाय ठेवणार नाही, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यात गुहागर विधानसभा मतदारसंघाला महत्त्व आले आहे. गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे, विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी भाजपाकडून या मतदारसंघावर दावा ठोकला आहे, तर रामदास कदम आपले बंधू चंद्रकांत कदम यांना इथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. चंद्रकांत कदम हे सध्या रामदाम कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचा दापोली मतदारसंघ सांभाळत आहेत. त्यांचा गुहागरमध्ये तगडा जनसंपर्क असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी. ते ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना कडवी झुंज देऊन विजयी होऊ शकतात असे रामदास कदम यांचे म्हणणे आहे.
शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विपुल कदम हे कामालाही लागले आहेत. विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये ‘धर्मवीर-२’ या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. नाक्या-नाक्यावरील विपुल कदम यांचे बॅनर गुहागरमध्ये राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. हे सगळे वातावरण पाहता गुहागर विधानसभा मतदारसंघातील विपुल कदम यांची राजकीय एंट्री निश्चित मानली जात आहे.
जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी नको! रामदास कदमांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
