नवी दिल्ली- मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जळगाव ते जालना या १७४ किमी लांबीचा ७,१०५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला काल केंद्राने मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव-जालना प्रकल्पाला मंजुरी दिली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि मराठवाड्यातील जालन्याला जोडणाऱ्या या प्रकल्पाला अजिंठा लेण्यांचे नावे दिली आहेत. हा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल, या प्रकल्पामुळे पर्यटन,उद्योग, खाते, सिमेंट आणि अन्य मालवाहतुकीला चालना मिळणार आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी हा जालना लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असून जगभरातून पर्यटक अजिंठ्याला येत असतात. या नवीन रेल्वेमार्गामुळे विदर्भासह मराठवाड्यातील प्रवाशांसाठी हा अत्यंत सोपा, सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. अजिंठा लेणीसह श्रीक्षेत्र राजूरचे मंदिर रेल्वेच्या नकाशावर आले पाहिजे यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकल्पाची मागणी लावून धरला होती.
रेल्वेमार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी दानवे यांच्या मंत्रिपदाच्या काळात जालना – जळगाव रेल्वेमार्गाच्या हवाई सर्वेक्षणासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. सर्वेक्षणानंतर बोर्डाचा अंतिम अहवाल प्रतीक्षेत होता. बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर जालना – जळगाव ब्रॉडगेजच्या १७४ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण ७ हजार १०५ कोटींच्या खर्चालाही मंजुरी मिळाली. हा प्रकल्प केंद्रीय रेल्वे विभागामार्फत राबवण्यासही मान्यता दिली आहे. जालन्यातून पीरपिंपळगाव, बावणे पांगरी, श्रीक्षेत्र राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा ७० टक्के मार्ग जालना लोकसभा मतदारासंघातून जाणार आहे आणि याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून होणार आहे.