जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धारण असलेल्या गिरणा धरणात सध्या केवळ ११.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हतनूर धरणात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही जळगाव जिल्ह्यातील ७ धरणे अद्याप कोरडी आहेत.
गिरणा धरण भरण्यासाठी नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस होणे गरजेचे आहे. हे धरण १९६५ साली बांधले असून आतापर्यंत ते फक्त १२ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील सात तालुके,दहा नगरपालिका,१३० पाणीपुरवठा योजना आणि १७४ गावे पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यातील अनवती,हिवरा,बहुळा , तोंडापूर,अंजनी,भोकरबारी आणि बोरी ही सात धरणे अद्याप कोरडी आहेत. मन्याड धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा आहे. सातपुड्यातील सुकी धरण मात्र पूर्ण भरले आहे. विदर्भात कोसळत असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीच्या माध्यमातून तापी नदीत पाणी येत असल्याने हतूनर धरणात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ६३ टक्के पाणीसाठा असल्याने शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.