जरांगे अखेर मैदानात! 25 उमेदवार जाहीर सहा उमेदवार पाडणार! अंतिम यादीला विलंब

जालना – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज अखेर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे-पाटील यांनी जाहीर केले की, काही मतदारसंघातून त्यांचे उमेदवार निवडणूक लढवणार, सहा मतदारसंघातील उमेदवार पाडणार आणि काही मतदारसंघातील उमेदवारांना पाठिंबा दिला जाईल. या यादीत मराठवाड्यातील 15 मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र जरांगे यांचे अनेक मतदारसंघांत बरेच उमेदवार इच्छुक असल्याने एकमत झाले नाही. या मतदारसंघात उमेदवार ठरवण्याचा निर्णय तुम्हीच घ्या, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असे उमेदवारांनी एकजुटीने सांगितल्याने उमेदवार निवडीची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
जरांगेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. कारण लोकसभेत जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव दिसून आला होता.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी बीडमधील नारायण गड येथे दसरा मेळावा घेऊन त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. या मेळाव्यात त्यांनी राज्यातील काही निवडक मतदारसंघांत उमेदवार उभे करणार, काही ठिकाणी उमेदवार पाडणार, तर काही उमेदवारांना पाठिंबा देण्याचे म्हटले होते. त्यानुसार जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आज सकाळपासून बैठक घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्हाला ज्यांनी बेजार केले त्यांना आम्ही पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासमोर राक्षस उभा आहे. आपण थोडे करायचे, पण नीट करायचे. पाठिंबा लेखी लिहून दिला, तरच त्याला मदत करायची. एससी-एसटीचे उमेदवार असतील त्यांना मदत करायची. आपला समाज हरला नाही पाहिजे. त्यामुळे जेवढे निवडून येतील तेवढेच लढायचे. आम्ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार उभे करू. याशिवाय दलित-मुस्लीम उमेदवारही उभे राहतील.
जरांगे यांनी मराठवाड्यातील ज्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे, त्यात केज (राखीव – बीड जिल्हा), परतूर (जालना जिल्हा), फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर जिल्हा), बीड (बीड जिल्हा), हिंगोली (हिंगोली जिल्हा), पाथरी (परभणी जिल्हा), हदगाव, (नांदेड जिल्हा) या मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र ही यादी अंतिम नाही.
जरांगे-पाटील यांनी ज्या मतदारसंघांत उमेदवार पाडायचा निर्णय घेतला आहे, त्यात भोकरदन (जालना जिल्हा), गंगाखेड (छत्रपती संभाजीनगर) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा), गंगाखेड (परभणी जिल्हा), जिंतूर (परभणी जिल्हा) औसा (लातूर जिल्हा) हे मतदारसंघ आहेत. तर बदनापूर (राखीव-जालना जिल्हा) आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) या मतदारसंघातील उमेदवारांना जरांगे-पाटील पाठिंबा देणार आहेत. यात आणखी मतदारसंघाचा समावेश होईल. दिवसभर बैठका घेऊनही उशिरापर्यंत यादी अंतिम झाली नव्हती.
फुलंब्रीत काँग्रेसने विलास अवताडे, तर भाजपाने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तिथे जरांगेंचा उमेदवार मैदानात असेल. परतूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंनी आसाराम बोराडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातही जरांगे उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना जरांगेंचा पाठिंबा मिळणार आहे. गंगापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत. तर भाजपाने इथे प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांची भूमिका मराठा आरक्षणविरोधी असल्याने मतदारसंघातील मराठा बांधव त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे- पाटील यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रत्नाकर गुट्टे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. जिंतूर मतदारसंघात भाजपाच्या मेघना बोर्डीकर आमदार आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका घेतली नाही. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात मेघना बोर्डीकर यांनी पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील मेळाव्यालादेखील हजेरी लावली. पण मनोज जरांगे-पाटील यांच्या नारायण गडावरील मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यामुळेच मराठा समाजामध्ये मेघना बोर्डीकर यांच्याविषयी नाराजी आहे. मेघना बोर्डीकर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. त्यांना पाडण्याचा प्रयत्न जरांगे-पाटील करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top