जरांगेंनी औषध, पाणीही सोडले! आता आरपार मुख्यमंत्री आज बैठकीत कोणता उपाय काढणार?

जालना – मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासंदर्भातील वंशावळीची अट काढून टाकण्याबाबतचा सुधारित जीआर राज्य सरकारने काढलेला नसल्याने उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी जाहीर केला. आजपासून त्यांनी सलाईन लावण्यास नकार दिला आणि पाणी पिणेही थांबवून आंदोलन तीव्र केले आहे. दरम्यान, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आरपारच्या या लढाईत आता मुख्यमंत्री कोणता तोडगा काढतात, बैठकीत उद्या कोणता उपाय निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री अडीचपर्यंत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीची माहिती आणि राज्य सरकारचा बंद लिफाफा जरांगे-पाटील यांना सरकारच्या वतीने आमदार अर्जुन खोतकर यांनी काल दिला. सरकारने जीआरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि सरकारला दिलेला 4 दिवसांचा अवधी संपल्यामुळे जरांगे पाटलांनी आज उपोषणाच्या 13व्या दिवशी औषध, पाण्याचा त्याग केला आहे. उद्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहेत. या आंदोलनाचे पडसाद अधिक तीव्र होत चालले आहेत. मात्र राज्य सरकारकडून अद्याप निर्णय घेतला जात नसल्याने याचा निषेध म्हणून आज धाराशिवमध्ये राज्य सरकारचा निषेध करत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर आज जालन्यात आंदोलनस्थळी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधवांनी गर्दी केली होती. मुंबईतही जालन्यातील लाठीमारविरोधात सकल मराठाकडून टरबूज फोडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

जालना लाठीहल्ला प्रकरणी
हायकोर्टात जनहित याचिका

जालना लाठीहल्ल्यात 1500 पोलीस आणि एसआरपीएफ जवानांनी आंदोलनकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केलेली होती. या प्रकरणी आता अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी 700 पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. ज्या अधिकार्‍यांच्या आदेशाने हा हल्ला झाला त्यांच्यावर मात्र काहीही कारवाई करण्यात आली नाही. या मारहाण प्रकरणी जे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी होते त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे आणि या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ आणि पारदर्शीपणे न्यायालयीन समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

प्रकृती खालावल्याने पिंपरीत
सतिश काळेंनी उपोषण सोडले

पिंपरीत गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सतिश काळे यांनी उपोषण सोडले आहे. काळे यांची प्रकृती खालावल्याने उपोषण सोडण्याचा निर्णय हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी नाईकवाडे तसेच जनआंदोलन चळवळीचे मार्गदर्शक मानव कांबळे यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले. पुढील उपचारासाठी काळे यांना तत्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top