नांदेड- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन आणि सहानुभूती मिळवण्यासाठी मुखेडमधील एका अपक्ष उमेदवाराने स्वतःची चार चाकी जाळली. यानंतर अज्ञात व्यक्तीने आपले वाहन जाळले असा बनावही केला. मात्र पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच बनाव उघडकीस आला. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी उमेदवारासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंधार तालुक्यातील करतळा येथील परसराम कदम यांनी मुखेड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मुखेड-बाहाळी रोडवर परसराम कदम यांनी पुतण्या अक्षय कदमच्या मदतीने स्वतःची टाटा सफारी कार डिझेल टाकून जाळली. त्यानंतर काका-पुतण्याने मुखेड पोलिसांना फोन करून आमची गाडी अज्ञात व्यक्तीने जाळल्याची माहिती दिली. घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याशिवाय अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यात आली. मात्र तपासादरम्यान संशय आल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी अक्षय कदम याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच निवडणुकीत प्रसिद्धीसाठी आणि जरांगे पाटलांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली काका-पुतण्याने दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुखेड पोलिसांनी अपक्ष उमेदवार परसराम कदम आणि त्यांचा पुतण्या अक्षय कदम या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला.