जय मालोकरचा मारहाणीमुळे मृत्यू! पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती

अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱे अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने केला होता. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
त्यानंतर आता जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये जय मालोकर याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचा म्हटले आहे. जय मालोकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचे म्हटले आहे. त्याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या. डोक्याला गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती, त्यामुळे त्याच्या मेंदूचे वजन वाढले. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाली. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. जय मालोकरच्या कुटुंबियांनी राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमके काय झाले होते या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. आमच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्हाला संरक्षणाची गरज आहे अशी मागणी त्याच्या भावाने प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top