जयसिंघानीला कोर्टाचा दणका
अटक कायदेशीरच! याचिका फेटाळली

मुंबई – अमृता फडणवीस खंडणी आणि धमकीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज बुकी अनिल जयसिंघानीची याचिका फेटाळून लावली. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत जयसिंघानी आणि त्याच्या भावाने दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या कोठडीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेचा निकाल हायकोर्टाने गेल्या आठवड्यात राखून ठेवला होता. तो आज हायकोर्टाने जाहीर केला.
अमृता फडणवीसांना धमकी आणि 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी 20 मार्च रोजी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी सर्वात प्रथम अनिक्षाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीला गुजरातहून मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर जयसिंघानीने हायकोर्टात धाव घेतली. आपली अटक बेकायदाशीर असल्याचा दावा या याचिकेत त्याच्याकडून करण्यात आला. हायकोर्टाने गेल्या आठवड्यात या याचिकेचा निकाल राखून ठेवला होता. आज ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावत जयसिंघानीला झटका दिला.

Scroll to Top