नवी दिल्ली – उत्तर भारतात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३०५ वर सुमारे १ फूट बर्फाचा थर साचला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तापमान शून्याच्या खाली गेल्यामुळे हरितारा भागातील तलाव गोठला. या तलावावर मुलांचा क्रिकेट सामना रंगला होता. तर, बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक रस्ते बंद ठेवले आहेत. हिमाचलमध्ये २ महामार्गांसह २४ रस्त्यांवर सलग तिसऱ्या दिवशी बस वाहतूक बंद होती. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचे काम सुरु होते. उत्तराखंडमध्ये जोशीमठ आणि पिथौरागढमध्ये बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग बंद आहेत. डेहराडूनमध्येही तुनी-चकराता-मसूरी राष्ट्रीय महामार्गाचा ३० किमी भाग बर्फवृष्टीमुळे बंद आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस याठिकाणी बर्फवृष्टी सुरूच राहणार असून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, छत्तीसगड, दिल्ली या ८ राज्यांमध्ये वादळ आणि गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि या राज्यांचे तापमान घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाच्या इशाऱ्यासह पुढील ३ दिवस ही स्थिती कायम राहण्याचे नमूद केले. सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी असल्याची देखील माहिती दिली.