श्रीनगर : जम्मू काश्मीरच्य पुंछच्या तोता गली भागातील भट्टा डूरियन जंगलाजवळ आज गुरुवारी लष्कराच्या एका ट्रकला भीषण आग लागली. या घटनेत ५ जवान शहीद झाले आहेत. पण अद्याप लष्कराकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
प्राथमिक तपासात ही घटना वीज पडल्यामुळे घडल्याचा दावा केला जात आहे. पण सोबतच ट्रकवर ग्रेनेड हल्ला झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. लष्करी सूत्रांनी ही आग स्फोट, ग्रेनेड हल्ला व वीज कोसळल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी पाऊस सुरू होता. त्यामुळे लष्कर सर्वच बाजूने या घटनेचा तपास करत आहे. दुर्घटना घडली ते ठिकाण पुंछहून ९० किमी अंतरावर आहे. दरम्यान लष्कराच्या ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. तर अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.