छत्रपती संभाजीनगर- बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथापठण कार्यक्रमात जमीर शेख या मुस्लिमाने आपली पत्नी आणि सात मुलांसह हिंदू धर्म स्वीकारला. सनातन धर्मावरील श्रद्धेपोटी धर्मांतर केल्याचे जमीर शेख यांनी सांगितले. आपल्यावर धर्मांतरासाठी कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या धर्मांतराच्या घटनेने मुस्लीम धर्मीयांमध्ये खळबळ उडाली आहे. काही मुस्लिमांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या तर हिंदुंमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जमीर शेख यांना हिंदू धर्माची दीक्षा दिल्यानंतर बागेश्वर बाबा म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या हिंदू धर्मियांना आपण ही 9 लोकांची भेट देत आहोत.
धीरेंद्र शास्त्री यांचा कथापठण कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरात सुरू होता. त्यात कथेच्या समारोपप्रसंगी हा धर्मांतराचा कार्यक्रम झाला. जमीर शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी धीरेंद्र शास्त्रींकडून हिंदू धर्माची दीक्षा घेतली. जमीर शेख हे आता शिवराम आर्य झाले आहेत. त्यांच्या पत्नीनेही अंजुम हे नाव बदलून सीता ठेवले आहे.
अहमदनगरमध्ये राहणारे जमीर शेख हे व्यवसायाने मजूर आहेत. ते लहानपणापासून हिंदू धर्मानुसारच सर्व रितीरिवाज पाळतात. ते दरवर्षी गणपतीही बसवतात. त्यांना हिंदू धर्मात यायचे होते. त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींकडून दीक्षा घेतली. जमीर शेख यांना पाच मुली आणि दोन मुलगे अशी सात मुले आहेत. या मुलांच्या जन्मामागची कथाही त्यांनी सर्वांना जाहीरपणे या कार्यक्रमात सांगितली. ते म्हणाले, ‘मला पाच मुलीच होत्या. मुलगा होण्यासाठी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हे श्रीकृष्णाचे भजन मी गायले. कृष्णाला अभिषेकही केला आणि श्रावणात मला मुलगा झाला. माझे दोन्ही मुलगे श्रीकृष्णाची भक्ती केल्याने मला झाले.’ त्यांच्या मुलांची नावे बलराम आणि कृष्ण आहेत. आपण दोन्ही मुलींची लग्ने हिंदू कुटुंबात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लहानपणापासून मी हिंदू धर्मानुसारच सर्व रितीरिवाज पाळत आलो आहोत. सनातन धर्मावरील प्रेमामुळे मी हिंदू धर्मात आलो. धर्मांतरासाठी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षा घेतल्यानंतर हे संपूर्ण कुटुंबीय ‘बागेश्वर धाम की जय’, ‘जय श्रीराम’, ‘धीरेंद्र शास्त्री की जय’ अशा घोषणा देत होते. जमीर शेख म्हणाले, ‘आमचे आजी-आजोबा जालना येथील शेवता गावात राहत होते. पूर्वीपासून आमच्या घरात देवीचे ठाणे आहे. मात्र, 1972 मध्ये दुष्काळ पडला आणि आमचे आजी-आजोबा पोट भरण्यासाठी अहमदनगरमध्ये आले. त्यानंतर कधीही ते जालन्यात गेले नाहीत. पूर्वीपासूनच आम्ही हिंदू धर्माला मानतो. माझे आजी-आजोबा आणि आई-वडिलांनी देखील आपण सनातनी असल्याचे मला शिकवले आहे. आपण नेहमी पूजा पाठ करायचे, देवाचे स्मरण करायचे, कुणी काहीही म्हटले तरीही ऐकायचे नाही असे त्यांनी मला शिकवले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून धर्म परिवर्तन करण्याची आमची इच्छा होती.’
जमीरचा शिवराम झाला! अंजूम सीता झाली! मुस्लीम कुटुंबाचा हिंदू धर्मात प्रवेश
