सुदैवाने थोडक्यात बचावले
टोकियो – वाकायामा शहरात पोटनिवडणुकीचा प्रचार करत असताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने ते सुखरूप बचावले आहेत. सुरक्षा दलांनी घटनास्थळीच हल्लेखोरांना अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारासोबत बोलत उभे होते. तेवढ्यात त्यांच्या दिशेने एक स्मोक बॉम्ब फेकण्यात आला. परंतु, तो फुटण्याआधीच किशिदा यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याठिकाणी स्फोटासारखा मोठा आवाज आला. त्यामुळे तेथेे उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला. लोकांनी सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव केली. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना अटक केली. हा हल्ला झाल्यानंतर किशिदा यांचे येथील भाषण रद्द करण्यात आले. फुमियो किशिदा सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाल्यानंतर नऊ महिन्यांनंतर ही घटना घडली.