सांगली – जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे.तरीही भाजपाने लिंगायत समाजाला तिकीट दिले नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी लिंगायत समाजावर केलेला हा अन्याय आहे, असा आरोप अभिनव गुरुलिंग जंगमा महास्वामीजी यांनी केला आहे.
अभिनव गुरुलिंग जंगमा महास्वामीजी म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करून जत मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे तम्मनगौडा रवीपाटील यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार संघातील सर्व समाजाच्या लोकांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या मतदारसंघात भाजपने उपरा असलेले गोपीचंद पडळकर यांचे मतदारसंघात नाव नसताना उमेदवारी दिली आहे. पडळकर हे या तालुक्यातील नाहीत, त्यांना येथील प्रश्नच माहित नसतील तर ते कोणता विकास करणार ? खरे तर लाखोंच्या संख्येने असलेल्या लिंगायत समाजातील एकही आमदार आजपर्यंत निवडून आला नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.