मुंबई – जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवरायांविषयी एक कथा प्रसारित केली. यात शिवरायांचा अपमान झाल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी आक्षेप घेतला असून जग्गी वासुदेव यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक अॅनिमेशन कथा प्रसारित केली, ज्यात शिवरायांचा अवमान झाल्याचे आव्हाडांचे म्हणणे आहे.
‘जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (अॅनिमेशन) प्रसारित केली. ज्यात रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु होता. रामदासाला भिक्षा मागताना पाहून महाराजांनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले. रामदासाच्या आदेशाने शिवाजी महाराज राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले. पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले’, असे दाखवण्यात आल्याचे आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटले.
‘छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते. यातून त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल’, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.