वॉशिंग्टन – जगातील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्कच्या स्पेस रिसर्च कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशिप रॉकेटचा प्रक्षेपण होताच त्याचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टारशिप रॉकेटचे हवेत तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले. हे रॉकेट प्रक्षेपित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.टेक्सासच्या बोका चिका येथून या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
खरे तर स्टारशिप रॉकेटचे प्रक्षेपण तीन दिवसांपूर्वीच ठरले होते. मात्र, प्रेशर व्हॉल्व्ह फ्रीज झाल्यामुळे
हे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले होते.त्यानंतर काल गुरुवारी संध्याकाळी स्पेस एक्सने हे रॉकेट प्रक्षेपित करताच सुरुवातीला सर्वकाही ठीक वाटत होते, परंतु कक्षेत जाण्यापूर्वी रॉकेटमध्ये एक जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे रॉकेटचा हवेतच तुकडे झाले.या घटनेचे व्हिडिओही समोर येत आहेत.ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की प्रक्षेपणानंतर हे रॉकेट जमिनीपासून खूप उंचावर पोहोचले होते.मात्र अचानक त्याचा स्फोट झाला. स्पेस एक्स कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे.कारण या कंपनीला या रॉकेटकडून खूप आशा होत्या.
स्पेस एक्स ने रॉकेटबद्दल माहिती शेअर केली होती की या रॉकेटच्या मदतीने मानवांना इतर ग्रहांवर देखील पाठवले जाऊ शकते. कंपनीने सांगितले होते की इलॉन मस्क यांना २०२९ पर्यंत अंतराळात मानव पाठवायचा आहे आणि तिथे मानवांसाठी राहण्याची व्यवस्था देखील करायची आहे.या ऑपरेशनसाठी स्टारशिप तयार करण्यात आली होती.हे आतापर्यंतचे जगातील सर्वात मोठे रॉकेट होते.त्याची उंची ३९५ फूट म्हणजे १२० मीटर होती. अलीकडेच नासाने २०२५ पर्यंत अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याबाबत घोषणा केली होती.