जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडला अनेक दिवस मोजणी चालणार

भुवनेश्वरपुरी – येथील जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडाराचा दरवाजा आज दुपारी १ वाजून २८ मिनिटांच्या शुभमुर्हुतावर उघडण्यात आला. या खजिन्याचे दरवाजे उघडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या उपस्थितीत हे दरवाजे उघडण्यात आले. मोजणी कालावधीतील सुरक्षेसाठी पोलिसांच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या खजिन्याच्या मोजणीला अनेक दिवस लागण्याची शक्यता असून त्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

जगन्नाथ पुरीच्या मंदिरातील या रत्नभांडाराचा मुद्दा ओदिशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजला होता. पंतप्रधान मोदी यांनीही या खजिन्याची चावी हरवल्यावरून बिजू जनता दलावर टीका केली होती. हे प्रकरण न्यायलयातही गेले. आता ४६ वर्षांनंतर हे रत्नभांडार उघडण्यात आले आहे. रत्न भांडार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांच्या नेतृत्वाखालील ११ जणांचा चमू ही मोजणी करणार आहे. या मोजणीनंतर खजिना ठेवण्यासाठी एकूण १५ मोठ्या पेट्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यातील ६ पेट्या आज मंदिरात आणण्यात आल्या. या पेट्या ४ फूट लांब दोन फूट उंच व २ फूट रुंदीच्या आहेत. भुवनेश्वर येथील नयापल्ली भागात या पेट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मोजणीसाठी पोलिसांच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या असून त्याचबरोबर एक वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. या मंदिराचे सिंहद्वार वगळता इतर दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आज दुपारी मंदिराच्या खजिनदाराकडे असलेली खजिन्याची चावी कमिटीच्या अधिकृत सदस्यांकडे देण्यात आली. या मोजणीसाठी समितीला सहाय्य करण्यासाठी सर्पमित्रांचा एक चमूही तैनात आला आहे. कारण या खजिन्याभोवती साप असण्याची भीती अनेक जण व्यक्त करत आहेत. एका रुग्णवाहिकेची आणि दोन जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. खजिन्याच्या मोजणीसाठी आज सकाळी लोकनाथ मंदिरातून आज्ञा माला आणण्यात आली. त्यानंतर विधिवत हे दरवाजे उघडण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top