भुवनेश्वर – पुरी येथील प्रसिध्द पुरातन जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार रविवारी 14 जुलै रोजी तब्बल 46 वर्षांनी उघडण्यात आले. या रत्नभांडारातील आभूषणे हलवण्याची प्रक्रिया पुढील काही दिवस चालणार आहे. मात्र धक्कादायक गोष्ट अशी की, 14 जुलैला हे रत्नभांडार उघडण्यासाठी डुप्लिकेट किल्ल्यांचा वापर करण्यात आला. परंतु या किल्ल्या लागल्याच नाहीत. त्यामुळे अखेर कुलूप तोडून रत्नभांडार उघडण्यात आले. ओदिशा सरकारने आता याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडाराच्या हरवलेल्या चाव्यांचा मुद्दा गाजला होता.आता यावरून ओदिशात पुन्हा राजकारण तापले आहे.
ओदिशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने या खजिन्याच्या हरवलेल्या मूळ चावीवरून तत्कालीन सत्ताधारी बिजू जनता दलावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांनीही जाहीर सभेत नवीन पटनायक यांच्यावर टीका करत निवडणुकीत भाजपा जिंकल्यास मूळ चावी शोधून खजिना उघडण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. रत्नभांडारच्या मूळ चाव्या हरवल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आणि चौकशी समिती नेमण्यात आली. त्यानंतर मंदिर समितीने कोर्टात डुप्लिकेट चावी सादर केली. मूळ चावी गायब आणि समितीकडे डुप्लिकेट चावी यामुळे हा विषय तापला. पंतप्रधान मोदींनी पटनायक सरकारवर आरोप करीत मूळ चावी कुठे आहे ते शोधून काढू, असे प्रत्येक सभेत सांगितले. मात्र मूळ चावी मिळालेली नसतानाच ओदिशात सत्तेवर येताच भाजपाचे सरकार आल्यावर हा खजिना उघडण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात डुप्लिकेट चावीनेही दार उघडले नाही. अखेर कुलूप फोडावे लागले.
12 व्या शतकात बांधण्यात आलेल्या जगन्नाथ मंदिरातील हा खजिना मंदिराच्या तळघरात असून, तो दोन भागांत विभागलेला आहे. बाह्य कक्षात जगन्नाथासह सुभद्रा आणि बलभद्र यांची नियमित वापरण्याची आभूषणे आहेत. तर इतर मौल्यवान आभूषण आतील कक्षात ठेवली आहेत. हा खजिना उघडण्यासाठी सरकारने 11 जणांची विशेष समिती स्थापन केली होती. या समितीच्या सदस्यांनी 14 जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या दोन डुप्लिकेट किल्ल्यांनी खजिन्याची तीन कुलूपे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ही कुलूपे या किल्ल्या वापरून उघडता आली नाहीत. त्यामुळे मानक कार्यपद्धती (एसओपी) वापरून न्याय दंडाधिकार्यांसमक्ष ती तोडण्यात आली आणि आतील कक्षात प्रवेश करण्यात आला, अशी माहिती जगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक अरबिंदा पाधी यांनी दिली.
जगन्नाथ मंदिर ओदिशाच्या कायदा खात्याच्या अंतर्गत येते. ओदिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन याबाबत म्हणाले की, या खजिन्याच्या डुप्लिकेट चाव्या उपलब्ध असल्याची खोटी माहिती मागील बिजद सरकारने पसरवली होती. आता याची नक्कीच चौकशी केली जाईल. याआधी कुणी खजिन्याला हात लावण्याचा प्रयत्न केला असल्यास त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. अशा घटना घडायला नको होत्या. आता तपासणी पूर्ण झाल्यावर याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होईल.
4 एप्रिल 2018 रोजी ओदिशा सरकारने तपासणीसाठी या खजिन्याचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चाव्या नसल्याने तो यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी अचानक या खजिन्याच्या डुप्लिकेट चाव्या सापडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी 2018 मध्ये ओदिशा सरकारने न्या. रघुबीर दास यांचा आयोग नेमला होता. या आयोगाने त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला अहवाल सरकारला दिला होता. परंतु तो अजून जाहीर करण्यात आलेला नाही.
खजिन्याच्या चाव्यांवरून टीका झाल्यावर बिजदने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. बिजदचे वरिष्ठ नेते अमर प्रसाद सत्पथी यांनी हरवलेल्या चाव्यांच्या प्रकरणी नेमलेल्या न्या. रघुबीर दास यांच्या आयोगाने दिलेला अहवाल उघड करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, आणखी चौकशी करण्यापेक्षा आयोगाचा अहवाल आणि त्यावर काय कार्यवाही केली, ते
लोकांना सांगावे.
काँग्रेसनेही बिजदच्या सुरात सूर मिसळत खजिन्याच्या चाव्यांच्या बाबतीत नेमके चित्र स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. ओदिशा काँग्रेस प्रवक्ते बिश्वरंजन मोहंती म्हणाले की, खजिन्याचे कुलूप तोडायची वेळ का आली? खर्या चाव्या कुणाकडे आहेत? हे लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
रत्नभांडार गुरुवारी पुन्हा उघडणार
जगन्नाथ मंदिरातील आभूषणे हलवण्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. बहुदा यात्रा आणि 17 तारखेला सुना बेशा या सणांमुळे हे काम थांबवण्यात आले आहे. सध्या या रत्नभांडारातील बाह्य कक्षातील दागिने हलवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी मंदिर परिसरात कोषागार तयार करण्यात आले आहे. रत्नभांडारातील आतील कक्षातील आभूषणे 18 तारखेला हलवण्यात येतील. याशिवाय रत्नभांडाराची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.