मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला २०२१ मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ही जन्मठेप शिक्षा स्थगित करून त्याला जामीन मंजूर करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संजय करोल आणि संदीप मेहता यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने छोटा राजनला नोटीस बजावत चार आठवड्यांत त्यांचे उत्तर मागितले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात एका विशेष न्यायालयाने छोटा राजनला शेट्टीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात छोटा राजनने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा स्थगित केली आणि जामीन मंजूर केला. याच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
४ मे २००१ रोजी मध्य मुंबईतील गावदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलचे मालक शेट्टी यांची हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राजनच्या टोळीतील दोन सदस्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. छोटा राजन टोळीचा सदस्य हेमंत पुजारी याच्याकडून शेट्टीला खंडणीचे फोन आले होते आणि पैसे न दिल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे चौकशीत दिसून आले.