रायगड – किल्ले रायगडावर ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. गडावर राज्यभरासह कर्नाटकातील निपाणी, संकेश्वर, बेळगावमधून अडीच लाख शिवभक्त जमले होते.
सकाळी ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून निघाला होता. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषांनी शिवभक्तांमध्ये उत्साह संचारलेला. गडावर चित्तथरारक अशी प्रात्यक्षिके शिवभक्तांनी सादर केली. यासाठी सोमवारीच राज्यातील ४० आखाडे मर्दानी खेळ दाखवण्यासाठी गडावर दाखल झाले होते. अनेक शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून शिवकाल समोर उभा केला. मर्दानी खेळांच्या माध्यमातून राज्यातील पारंपरिक खेळाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना स्वरक्षण कसे करायचे याचेही धडे दिले. मावळ्यांच्या वेशभूषेतील तरुणांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान सकाळी राजदरबारात सुरू झालेल्या या मुख्य सोहळ्यादरम्यान आमदार रोहित पवार, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बंटी उर्फ सतेज पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांसह सर्व पदाधिकारी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी शिवभक्तांच्या उत्साह पाहत संभाजीराजे छत्रपती भावुक झाले होते. ते म्हणाले की, मी तर एक निमित्त आहे. शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. हा फक्त शिवराज्याभिषेक सोहळा नाही तर उत्सव बनला आहे.”
दरम्यान आज कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच पुण्यातील ऐतिहासीक लाल महालात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती. याशिवाय आज राजभवनात शिवराज्याभिषेकातील सायंकाळी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.