बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले जात आहे.
छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या भुताही या तळावर आज दुपारी ही घटना घडली. सीएएफ ११ व्या बटालियनच्या जवानांचे दुपारी जेवण सुरु असतांना एका जवानाने जेवणात तिखट मागितले. त्याला नकार दिल्यानंतर त्याचा राग येऊन त्याने आपल्याकडील सरकारी बंदूकीतून अंदाधुंद गोळ्या चालवल्या. यात दोन जवान घटनास्थळीच ठार झाले असून इतर दोघेजण जखमी झाले. हल्ला करणाऱ्या जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी जवानांना कुसमी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.