मुंबई – चेंबूरच्या मेट्रोचे अर्धवट बांधकाम रहिवासी सोसायटीवर कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. वडाळ्यापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. सध्या येथे मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असून सळई व काँक्रीटच्या साहाय्याने हे खांब उभारले जात आहे. यातीलच एक अर्धवट उभारलेला खांब सुमन नगर येथील एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर व मोकळ्या जागेत कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही. मात्र साधारणतः २० फूट उंच असलेल्या या सळ्या कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे मेट्रोच्या कामावर, बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
चेंबुरमध्ये मेट्रोचे बांधकाम कोसळले
