*अध्यक्ष ब्रॉकमनचाही राजीनामा
कॅलिफोर्निया – ओपनएआय या कंपनीने काही महिन्यांपूर्वी ‘चॅटजीपीटी ‘ या लोकप्रिय चॅटबॉटची निर्मिती करून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.आता चॅटबॉटची निर्मिती करणारे,कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे. कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर बोर्डाला विश्वास नव्हता, असे कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
या घडामोडीनंतर कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती आता अंतरिम सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. सीईओ पदावरुन हटवल्यानंतर ऑल्टमनने एक ट्विट केले. “मी ओपनएआयसोबत घालवलेला वेळ खूप छान होता.कंपनीतील प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला.राजीनामा हा परिवर्तनवादी निर्णय होता. पुढे काय करणार आणि काय होईल,हे नंतर सांगेन.” तसेच ब्रॉकमन याने अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आपल्या कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांना एक मेल पाठवला. या मेलमध्ये त्याने म्हटले आहे की, सर्वांना शुभेच्छा! मला एक सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता बनायचे होते,ज्याचा समाज कल्याणसाठी फायदा होऊ शकतो.
दरम्यान, कंपनीच्या प्रभारी सीईओ मीरा मुराती या अल्बेनियाची आहेत.मीरा यांचे शिक्षण कॅनडात झाले असून ती व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे.डार्टमाउथ कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणादरम्यान मीरा मुराती यांनी हायब्रीड रेस कार बनवली. याआधी मीराने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्लामध्ये काम केले आणि कंपनीची मॉडेल एक्स कार विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.मीरा यांनी टेस्ला येथे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून तीन वर्षे काम केले आहे.