बीजिंग – कोविड -19 नंतर चीनमध्ये आता नव्या आजारांनी थैमान घातले आहे. या आजारांची लागण लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच होत असल्यामुळे चीनमधील रुग्णालये पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. रुग्णालयांमधील गर्दीची दृश्य फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
चीनमधून सर्वत्र पसरलेल्या कोविड-19 या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. अख्ख्या जगात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे जगाचे चित्रच बदलून गेले. लाखो लोकांनी आपले नातेवाईक गमावले. तर कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली.
कोरोना महामारीच्या या कटू आठवणी पूर्णपणे विसरल्या जात नाहीत तोच चीनमध्ये एन्फ्युएंझा-ए, मायकॉपाझ्मा न्यूमोनिया आणि एचएमपीव्ही या आजारांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटना आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.