बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने अंतर्गत फेररचनेला सुरुवात केली असून माजी परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांची केंद्रीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर माजी संरक्षणमंत्री ली शांग्फू आणि अन्य दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
लष्करातील भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोठी मोहीम सुरू केली असून त्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. स्वतः जिनपिंग हे कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस आहेत. जिनपिंग यांनी २०१२ मध्ये चीनची सत्ता हातात घेतल्यानंतर लष्करातील ५० बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता.’पीपल्स लिबरेशन आर्मी’चे अन्य एक वरिष्ठ अधिकारी सन जिनमिंग यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेशिस्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे.मागील चार दिवसांपासून सुरू असलेली केंद्रीय समितीची बैठक गुरुवारी संपली. या बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आला.