बीजिंग : चीनने अरबी समुद्राच्या सर्वेक्षणासाठी आपली दोन मत्स्य संशोधन जहाजं भारताच्या जवळ तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. ही जहाजं हिंदी महासागरापासून अरबी समुद्रापर्यंत सर्वेक्षण करत आहेत. सागरी संसाधनांचा शोध घेणं हा यामागे उद्देश आहे, असं सांगितलं जात आहे. मात्र ज्या भागात चिनी जहाजं सर्वेक्षणाची कामं करत आहेत ती भारताच्या किनारपट्टीला लागून असलेली आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रं आहेत. अशा परिस्थितीत चीनचं हे पाऊल भारतासाठी तणाव वाढवणारं ठरू शकतं.चीन दुर्गम भागात अनधिकृतपणे मासेमारीसाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. अनेक देशांनी याबाबत चीनचा निषेध देखील केला आहे. , २ फेब्रुवारी २०२५ रोजी चीनकडून आलेली जहाजं अरबी समुद्रात मत्स्यपालन क्षेत्रासाठी संशोधन करत आहेत.
चीनकडे जगातील सर्वात मोठा मासेमारी ताफा आहे. या ताफ्यात हजारो जहाजं आहेत, जी गरजेच्या वेळी चिनी नौदलासाठी काम करतात. तैवानसोबतच्या तणावादरम्यान या ताफ्याने चिनी नौदलाच्या बाजूने काम केलं आहे. हे ताफे बेकायदेशीरपणे, प्रतिबंधित भागात आणि अनियंत्रित पद्धतीने मासेमारी करतात. याचा स्थानिक मासेमारी समुदायावर आर्थिक परिणाम होतो आणि त्यांना मासेमारी करता येत नाही, त्यामुळे मासेमाऱ्यांना त्या भागात मासे मिळत नाहीत. दुसरीकडे सागरी सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीवरही याचा परिणाम होतो.