बीजिंग – महिनाभरापासून बेपत्ता असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री क्विन गेंग यांना काल त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. ते केवळ ८ महिने या पदावर होते.
क्विन गेंग डिसेंबर २०२२ मध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री बनले होते. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांच्या जागी मा झाओक्सू यांची निवड करू शकतात. सध्या ते वरिष्ठ मुत्सद्दी आहेत असून परराष्ट्र मंत्रालयात क्रमांक दोन पदावर आहेत.
२५ जून रोजी रशियन, श्रीलंका आणि व्हिएतनामी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत गेंग शेवटचे दिसले होते. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. जवळपास महिनाभर क्विन गेंग कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही.
चीनचे परराष्ट्र मंत्री क्विन गेंग हे ४ जुलै रोजी युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांची भेट घेणार होते, परंतु ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. याबाबत बोरेल यांना दोन दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली होती. बैठकीला मुदतवाढ देण्याचे कारण सांगण्यात आले नाही. ७ जुलै रोजी पत्रकारांनी प्रथमच चीनचे परराष्ट्र मंत्री गेंग यांच्याबद्दल विचारले. त्यावेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे उत्तर दिले की, आमच्याकडे गेंग यांच्याविषयी कोणतीही माहिती नाही. १० आणि ११ जुलै रोजी गेंग इंडोनेशियातील एका शिखर परिषदेत सहभागी होणार होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या परिषदेत जाऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले.
गेंग फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीतही दिसले नाहीत. यानंतर गेंग बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली. गेंग यांच्या अमेरिकन वृत्तनिवेदक महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या आणि त्याची चौकशी सुरू असल्याच्याही बातम्या आल्या होत्या.