उरण – कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी-चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे.या जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी, नागरिकांकडून होत आहे.
पनवेल आणि उरण तालुक्याच्या सभोवताली डोंगरपट्टा आहे.उरण तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यालगत कर्नाळा पक्षी अभयारण्य असून अनेक वेळा या परिसरातील जंगलात बिबट्या आढळल्याचे जंगल परिसरातील शेतकरी, रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे.त्यातच शनिवारी दिघाटी गावातील शेतकरी जयवंत पाटील यांच्या खारपाडा-केळवणे रस्त्यावरील शेतामध्ये त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले.त्यांनी ही बातमी प्राणीमित्र अभिमन्यू पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी बिबट्याच्या पायांच्या ठशांची छायाचित्रे उरण वनविभागाला पाठवली आहेत.त्यावरून येथे बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाची पाहणी करावी.तसेच जंगलात बिबट्याचा वावर असल्यास बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी दिघाटीचे सरपंच अमित पाटील यांनी केली.
चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर
