*आज मूळगावी अंत्यसंस्कार
चिपळूण – तालुक्यातील मोरवणे ढगळेवाडी येथील सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनात शहीद झाले. ते
३६ वर्षांचे होते.भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्यासाठी रेकी करताना अचानक बर्फ आणि दरड कोसळून त्यात चार भारतीय जवान गाडले जाऊन शहीद झाले.त्यात अजय ढगळे यांचाही समावेश होता.त्यांच्यावर उद्या सोमवारी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, २ भाऊ, ४ बहिणी असा परिवार आहे.
दरवर्षी या हंगामात तैवांग येथे बर्फ वितळतो. यावेळी सैनिकी कारवाईसाठी चीनच्या सीमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. या कामासाठी गेलेल्या सुभेदार अजय ढगळे व अन्य ४ जणांवर दरड कोसळली. त्यात सर्वजण गाडले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. २४ मार्चपासून सिक्कीममध्ये सततचा पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. त्यानुसार भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेकी करण्यास गेलेले ढगळे व त्यांच्या टीमला काही कळण्याआधीच दरड कोसळून ते माती व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. गेले सहा दिवस भारतीय सैन्य सुभेदार ढगळे यांचा शोध घेत होते. अखेर काल शनिवारी सकाळी शहीद जवान ढगळे यांचा मृतदेह चिखल व दगडमातीखाली सापडला. हे वृत्त मोरवणे येथे पोहोचताच ग्रामस्थांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले.
अजय ढगळे यांचे पार्थिव काल संध्याकाळी तैवांगला आणले आहे; पण हवामान खराब असल्यामुळे रस्तामार्गाने रविवारी संध्याकाळी गुवाहाटीला व तेथून पुढे विमानाने पुणेमार्गे सोमवारी त्यांच्या मूळ गावी मोरवणे येथे आणले जाणार आहे.त्याच दिवशी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शहीद सुभेदार अजय ढगळे हे महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते चिपळूणमधील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहात होते. त्यांचे वडील शांताराम ढगळे हेदेखील सैन्यात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. शहीद अजय ढगळे हे कारगिल लढाईवेळी टायगर हिल जिंकणाऱ्या सैनिकांच्या पथकामध्ये होते.