नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर शिवसेना नेते या राज्यात प्रचाराला जाणार आहेत.
या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेय की, माझ्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष, जो हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेवर चालला आहे. याच विचारधारेतून आम्ही पुन्हा एकदा एनडीए आघाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सहभागी झालो. शिवसेना पक्षाचे देशातील विविध राज्यात सक्रीय युनिट आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील निवडणुकीत आम्ही प्रचारात सहभागी होऊन भाजपा उमेदवारांना पाठिंबा देऊ. त्याचसोबत मी आमच्या सर्व राज्याच्या प्रमुखांना स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, “राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपासोबत शिवसेनेची २५ वर्ष युती होती. त्यामुळे या ४ राज्याच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार शिवसेनेकडून केला जाईल. स्वत: मुख्यमंत्रीही प्रचाराला जाणार आहेत. एनडीएच्या माध्यमातून भाजपाला यश मिळावे यासाठी शिवसेना तत्पर असणार आहे”, असे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वत: प्रचाराला जाणार
