डेहरादून –
चारधाम यात्रेला सुरूवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील जिल्ह्यांमध्ये पाच दिवस हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. यासोबतच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश , दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि देशातील इतर राज्यांतून येणाऱ्या यात्रेकरूंना उत्तराखंडच्या हवामानाची माहिती घेऊनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
यमुनोत्रीमध्ये दिवसभर अधूनमधून बर्फवृष्टी सुरूच आहे. त्यातच गंगोत्रीच्या उंच शिखरांवर पुन्हा हिमवृष्टी आणि धाममध्ये पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे. केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. धाम परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, त्यामुळे तापमानातही घट झाली आहे.
हिमल्खलनाच्या इशाऱ्यामुळे रस्त्यावरुन प्रवास करणे यात्रेकरुंसाठी धोकादायक ठरू शकते. या कारणास्तव, हवामान खात्याने नवीन इशारा जारी करताना प्रवाशांना जिथे आहात तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. हवामानाची माहिती मिळाल्यानंतरच पुढील प्रवास करण्याचे सुचवले आहे.