सांगली- सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात आज पहाटे ४.४७ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल होती. तर भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती पासून ८ किलोमीटर अंतरावर होता. गेल्या सात दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरण ८५ टक्के इतके भरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही किंवा वित्तहानी झालेली नाही. त्याचबरोबर चांदोली धरणालादेखील कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, अतिवृष्टी आणि आता भूकंपाच्या धक्क्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.