हनोई : व्हियतनामची राजधानी हनोईच्या व्हियतनाम नॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेसने आपल्या प्रवेश नियमांत अजब बदल केला आहे. विद्यापीठाने या वर्षी व्यवस्थापन कोर्समध्ये प्रवेशासाठी उंचीच्या मानकाचा समावेश केला आहे. विद्यार्थिनींसाठी किमान ५ फूट २ इंच आणि विद्यार्थ्यांसाठी ५ फूट ४ इंच उंची निश्चित केली आहे. प्रथम विद्यापीठाने सर्व कोर्सेससाठी उंचीचे मानक निश्चित केले होते. मात्र, वाद वाढल्यावर विद्यापीठाने उंचीचे मानक फक्त मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी कोर्सेससाठी लागू केले आहेत.
विद्यापीठ प्रशासनानुसार, शारीरिक गुण, उदा. उंची ही आत्मविश्वास आणि नेतृत्व यात महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यापीठाचा उद्देश भविष्यासाठी नेतृत्वआणि उत्कृष्ट व्यवस्थापक तयार करणे आहे आणि त्यासाठी शारीरिक गुण लक्षात घेणे आवश्यक आहे असा अजब तर्क केला आहे .
तज्ज्ञ या नियमावर सवाल उपस्थित करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणात अशा मानकांना महत्त्व असायला नको. एक चांगला मॅनेजर वा लीडरची गुणवत्ता त्याचे विचार, निर्णय क्षमता आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे, उंचीवर अवलंबून नाही . यशस्वी होण्यासाठी उंचीसारख्या बाबी आवश्यक आहेत का? विद्यार्थ्याच्या पात्रतेकडे दुर्लक्ष करणारे हे मानक आहेत का? असा त्यांचा प्रश्न आहे.